पोतराजचा व्यवसाय करणारे आणि जोगवा मागणारे नवरा-बायकोचे जोडपे हे दापोली येथून फिरून शुक्रवारी रात्री खेड मधील भरणे नाका या ठिकाणी काळकाई मंदिरासमोरील प्रांगणामध्ये झोपले होते. अज्ञात एका इसमाने त्या ठिकाणी येऊन त्या महिलेची छेडछाड काढण्यास सुरुवात केली. यावेळी त्या महिलेच्या नवऱ्याला जाग आली आणि त्या व्यक्तीला तिथून हटकले.
त्यानंतर थोड्या वेळाने तो इसम पुन्हा त्या ठिकाणी येऊन त्या महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर त्या महिलेचा नवरा याने त्याला प्रतिकार करत हटकले नंतर रागाच्याभरात त्या अज्ञात इसमाने त्या महिलेच्या पतीच्या डोक्यात अवजड लाकडाने जोरदार घाव घातला. यामध्ये त्या महिलेचा पती गंभीर जखमी झाला आणि जागेवर बेशुद्ध पडला. त्याच्यावर रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी निधन झाले ,
सुरेश कोळे या पोतराज च्या मृत्यू प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरावर भादवी कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा तसेच त्याच्या पत्नीची छेडछाड प्रकरणी भादवी कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून , या हल्लेखोराला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच खेड पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे.
तपासकामासंदर्भात हल्लेखोरांचा एक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हा व्यक्ती खेड मधील सुकिवली, वेरळ, खेड , भोस्ते , कळंबणी या गावातील अथवा परिसरातील असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या व्यक्तीची माहिती कोणाला असल्यास तात्काळ खेड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .