दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद जुनैद असं आहे. त्याला एटीएसच्या टीमने पुण्यातील दापोडी येथून अटक केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेला मोहम्मद जुनैद हा अकोल्याचा असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या जम्मू-काश्मीर येथील दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता.
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यासाठी त्याला पैसे मिळत होते. जम्मू काश्मीरमधून पैसे मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्याने 10 हजार रुपये घेतले होते. दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला जुनैद याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर आठवडाभर चौकशी केल्यानंतर 10 हजार रुपये घेतल्याचं मोहम्मद जुनैद याने मान्य केलं आहे.