प्रेम ही एक अशी भावना किंवा एक अशी अनुभूती आहे, जी माणसाला अंतर्मुख बदलते. कोणतीही व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा त्यांच्यापुढे वर्ण, धर्म, जात, पंथ, पैसा, शिक्षण आणि वय अशा कोणत्याच मर्यादा नसतात. म्हणूनच की काय, हे प्रेम अमर्याद असल्याचंच अनेकजण म्हणतात.
अशाच एका अमर्याद प्रेमाचं उदाहरण सध्या संपूर्ण भारतानं पाहिलं आहे. ग्वाल्हेरमध्ये ही घटना पाहायला मिळाली, जिथं 67 वर्षीय रामकली 28 वर्षीय भोलूच्या प्रेमात पडल्या.
लिव्हइनमध्ये राहण्यासाठी त्यांनी समाजाचीही तमा न बाळगता थेट न्यायालयाचं दार ठोठावलं. सध्या ही जोडी लिव्हइनमध्येच राहत असून, यापुढेही असंच राहण्यासाठी म्हऊन त्यांनी न्यायालयातून नोटरी बनवून घेतली आहे.

का गाठलं न्यायालय ?
गेल्या 6 वर्षांपासून रामकली आणि भोलू एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि एकत्र राहत आहेत. भविष्यातही एकमेकांना अशीच साथ देण्याची या दोघांचीही इच्छा आहे. पण, पुढे आपल्या नात्यात कोणताही वाद न होवो आणि नातं आणखी घट्ट होवो यासाठीच त्यांनी नोटरी करण्याचा निर्णय घेतला.
कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वादांपासून दूर राहण्यासाठी लिव्हइनमध्ये नोटरी तयार करण्यात येते. कायदेशीररित्या अशा कागदपत्रांची आवश्यकता नसते.
आवश्यकता असो किंवा नसो, फक्त प्रेम करण्यापर्यंतच न थांबचा रामकली आणि भोलू यांनी उचललेलं हे टोकाचं पाऊल म्हणजे त्यांच्या नात्याची एख वेगळी ओळख ठरत आहे असंच म्हणावं लागेल. कारण, या नात्याची नोटरी झाल्यामुळं आता सर्वदूर या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीचीच चर्चा सुरु आहे.