नाशिक : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम एमबीबीएस, (MBBS)तसेच दंतशास्त्र शाखेच्या बी. डीएस (BDS)अभ्यासक्रमाकरिता ऑप्शन फॉर्म (Option Form)भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. शुक्रवार (ता. २१)पासून २८ जानेवारीपर्यंत ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत असेल. ३१ जानेवारीला पहिली निवडयादी जाहीर केली जाणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. नीट परीक्षेतून पात्रता मिळविलेले विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करायची होती. नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिल्यानंतर आता पुढील प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्राधान्यक्रम निवडीसाठी ऑप्शन फॉर्म सादर करायचे आहेत. सध्या एमबीबीएस, बीडीएस या शिक्षणक्रमांकरिता ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून २८ जानेवारीपर्यंत ऑप्शन फॉर्म भरावयाचे आहेत. एमबीबीएस, बीडीएस यासाठी पहिली निवडयादी ३१ जानेवारीला सायंकाळी पाचला जाहीर केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चितीसाठी १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल.
अन्य शिक्षणक्रमांचे वेळापत्रक लवकरच
सध्या एमबीबीएस व बीडीएस शिक्षणक्रमांसाठीचे वेळापत्रक जारी झालेले आहे. आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरपी, बी. एस्सी. (नर्सिंग) अशा अन्य सर्व शिक्षणक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांची सामान्य गुणवत्तायादी बुधवारी (ता. १९) दुपारी तीनला प्रसिद्ध केली जाणार आहे. तर तात्पुरती गुणवत्तायादी सायंकाळी सहाला प्रसिद्ध केली जाणार आहे. एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या जागांचा तपशील गुरुवारी (ता. २०) प्रसिद्ध केला जाईल. शुक्रवार (ता. २१)पासून ऑप्शन भरायच्या प्रक्रियेला सुरवात होईल.