राज्य सरकारने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजेच केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत.
नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुधारित आदेशात नेमकं काय म्हटलं?
जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश
राज्य सरकारने आपल्या सुधारित आदेशात म्हटले, “ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे. यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे काम करणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश असेल.”
व्यायामशाळेबाबत (Gym) काय आदेश?
“व्यायामशाळा (जीम) देखील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, व्यायाम करताना मास्क वापरणे आवश्यक असणार आहे. तसेच व्यायामशाळेत केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल,” असंही या सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे.