महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्व वस्तीगृह बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त वस्तीगृहाची व्यवस्था असेल कारण ते सध्या त्यांच्या मायदेशी परतणे अवघड आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देवून वस्तीगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेज 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी देखील घोषणा केली.
“सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांशी निगडीत वस्तीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना आणि कालावधी देवून वस्तीगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी परदेशातून आले आहेत त्यांचे वस्तीगृहाची सुरक्षा बंद करु नये. सर्व काळजी करुन त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. कारण ते सध्या त्यांच्या देशात परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुरता वस्तीगृह सुरु ठेवले आहेत”, असं उदय सामंत म्हणाले.