भाजप आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर लावण्यात आले आहे. त्या बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहिण्यात आली आहे. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असेही लिहिण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. तसेच नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, नाराणय राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली.
नितेश राणे पोलिसांसमोर येत नसल्याने मुंबईत पोस्टबाजी करण्यात आली आहे. मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. हे बॅनर कोणी लावले असेल, याची जोरदार चर्चा शहरात करण्यात येत आहे.