दिल्लीत नवीन आदेश जाहीर केला गेला आहे. COVID-19 चा झपाट्याने पसरणारा ओमिक्रॉन प्रकार थांबवण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे पाऊलं टाकले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दिल्लीतील शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) ने सांगितले.
शहरातील वायू प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा आणि महाविद्यालये या महिन्याच्या सुरुवातीला बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. इयत्ता 6 वी आणि त्यावरील विद्यार्थ्यांना 18 डिसेंबरपासून वर्गांत उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती आणि इयत्ता 1 ते 5 च्या वर्गासाठी, 27 डिसेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी होती.
तथापि, प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक वर्गांसाठी 27 डिसेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या नाहीत. त्याऐवजी, दिल्ली सरकारने या विद्यार्थ्यांसाठी 15 जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्टी जाहीर केली.
आता नवीन डीडीएमए आदेशानंतर सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस आणि लायब्ररी बंद राहतील.
डीडीएमएने नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कार्यालये, मॉल्स, दुकाने, रेस्टॉरंट्स इत्यादींच्या क्रियाकलापांवर निर्बंध देखील जाहीर केले आहेत. दिल्लीतील नाईट कर्फ्यूची वेळ आता रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत असेल.
दिल्लीत सहा महिन्यांतील संसर्गामध्ये एकाच दिवसातील सर्वात मोठी वाढ झाल्यानंतर नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काल शहरात 331 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये दिल्लीचा वाटा दोन आठवड्यांत 2-3 टक्क्यांवरून 25-30 टक्क्यांवर गेला आहे.