कोरोना असो व नसो, महागाई गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने वाढतेय. कोरोना हे फक्त निमित्त आहे महागाईच्या आगीत तेल ओतण्याचं. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे दुरापास्त होऊन बसले आहे. जीवनावश्यक वस्तूंपैकी एक असणारी व रोज लागणारी गोष्ट म्हणजे घरगुती स्वयंपाकाचा गॅस. या गॅसच्या किमती अलीकडे अनियंत्रित झाल्या आहेत.
प्रत्येक कुटुंबाचे महिन्याचे बजेट असते. अशा महत्त्वपूर्ण वस्तू व सेवांच्या वाढत्या किमतीमुळे हे बजेट कोलमडते. गॅसच्या वाढत्या किमतींमुळे बजेट व बचत सांभाळणे कठीण जाते.
याचा एक मोठा परिणाम म्हणजे जास्त किमतीत कमी गॅस मिळतो. यावर एक चांगला उपाय म्हणजे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची बचत करणे. त्याच्या काही टिप्स आपण बघणार आहोत. जेणेकरून तुमचा गॅस लवकर संपणार नाही.
नवी दिल्ली, दि. २४ जून: तुमचा स्वयंपाकाचा गॅस लवकर संपत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायला हवं. गॅस योग्य पद्धतीने वापरण्याची काही युक्ती योजली, तर गॅसची बचत होऊ शकते. घरगुती गॅस वाया जाणार नाही याची काळजी घेणे ही फक्त महिलांची जबाबदारी आहे असं नाही. कुटुंबातल्या पुरुषांनी आणि किशोरवयीन मुलांनीही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठीच आपण काही खास टिप्स बघणार आहोत. जेणेकरून सर्वांच्या सहभागातून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची चांगली बचत होईल. बजेटदेखील कोलमडणार नाही.
अगोदर आवश्यक साहित्य गोळा करा:
स्वयंपाक करताना आपल्याला जे घटक, पदार्थ व वस्तू लागणार आहेत; ते सगळे गॅस शेगडी पेटवण्याआधीच जवळ आणून ठेवा. पूर्ण तयारी झाल्यानंतरच गॅस शेगडी प्रज्ज्वलित करावी.
यामुळे गॅस विनाकारण वाया जात नाही. गॅस पेटवल्यानंतर त्याचा पुरेपूर उपयोग होतो आणि स्वयंपाकाचा वेळही वाचतो.
प्रेशर कुकरचा वापर करा:
कुकर बंदिस्त असतो. त्यामध्ये वाफेवर अन्न लवकर शिजतं. त्यामुळे गॅस कमी लागतो. प्रेशर कुकरचा वापर जवळपास सर्व घरांत केला जातो.
पण तुम्ही कुकर वापरत नसाल, तर तो जरूर वापरा. त्यामुळे गॅसची बचत होते.
शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा:
भांड्यावर झाकण न ठेवता शिजवल्याने गॅस जास्त खर्च होतो. पण भांड्यावर झाकण ठेवलं, तर त्यातल्या ऊर्जेचा पुरेपूर वापर पदार्थ शिजवण्यासाठी केला जातो.
त्यामुळे गॅसची बचत तर होतेच, पण झाकण ठेवल्याने बाहेरील जीवजंतूंपासून शिजणाऱ्या अन्नपदार्थाचे रक्षणही होते..
कडधान्य व डाळी आधी भिजवा:
विविध धान्ये, कडधान्ये व डाळी, जसे हरभरा, राजमा, तांदूळ शिजवण्यापूर्वी किमान अर्धा तास भिजवून ठेवले पाहिजेत.
त्यामुळे ते शिजवण्यासाठी लागणारा गॅस वाचेल आणि पदार्थही कमी कालावधीत तयार होईल.
अन्न मंद आचेवर शिजवा:
अन्नपदार्थ लवकर शिजण्यासाठी गॅस वाढवण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे गॅस जास्त खर्च होतो. जास्त गॅस खर्च झाला, तर अन्नपदार्थ भांड्याला चिकटण्याचीही शक्यता असते.
त्यामुळे अन्नपदार्थ नेहमी मंद आचेवरच शिजवावेत. त्याने गॅसची बचत होते.
कक्ष तापमानाला आलेले पदार्थ गॅस शेगडीवर ठेवा:
फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ बाहेर काढताबरोबर शेगडीवर ठेवू नका. त्यांना अगोदर कक्ष तापमानाला येऊ द्या. समजा, फ्रीजमध्ये ठेवलेले दुध वापरायचे असेल, तर ते आधी फ्रीजबाहेर काढून थोडा वेळ पडू द्या.
कोणतेही अन्नपदार्थ सामान्य तापमानाला आल्यानंतरच गरम करायला ठेवावेत. त्यामुळे गॅसची बचत होते.
गरजेनुसार पाणी वापरा:
अन्नपदार्थ शिजवताना त्यामध्ये गरजेएवढंच पाणी घाला.
जास्त पाणी घातलं, तर अन्नपदार्थ शिजायला अधिक वेळ लागतो. ते पाणी आटण्यासाठी जास्त गॅस लागतो. म्हणजे एकाचवेळी दोन कामांसाठी जास्त गॅस खर्च होतो.
???? विनंती: खालील लिंकचा वापर करून आपल्या प्रियजनांना स्वराज्य डिजिटल मॅगझीनला जॉईन करा ???? http://swarajya24.com
???? जाहिरातिसाठी संपर्क: 77220 35765